

देवळा : गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला चकवा देणारा एक धक्कादायक आणि 'हायटेक' प्रकार देवळा तालुक्यात उघडकीस आला आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी थेट रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वाहनाची नंबर प्लेट काळ्या पडद्यामागे लपवण्याची अजब युक्ती तस्करांनी शोधली होती. मात्र, विठेवाडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तब्बल १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून मुख्य सराईत तस्कर फरार झाला आहे.
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेरवस्तीजवळ बुधवारी (दि. ८) रात्री एक कार (MH-४१-BL-९८४८) संशयास्पद फिरताना ग्रामस्थांना दिसली. ग्रामस्थांनी गाडी अडवून चौकशी केली असता चालकाची तारांबळ उडाली. संशय बळावल्याने ग्रामस्थांनी तातडीने देवळा पोलिसांशी संपर्क साधून गाडी व आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन सुरक्षा पथकाला पाचारण करून पुढील कायदेशीर कारवाई केली. यावेळी १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हेमंत प्रभाकर पवार (रा. भऊर, ता. देवळा) याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली असून त्याचा साथीदार आणि सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने (रा. खर्डे, ता. देवळा) हा पोलिसांना चकवा देऊन पसार झाला. देवळा पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मेने याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ही धडक कारवाई देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, राहुल शिरसाठ, दिलीप सोनवणे आणि श्रावण शिंदे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
रिमोट दाबताच नंबर प्लेट गायब!
या संपूर्ण कारवाईत सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे तस्करांनी वापरलेले 'हायटेक' तंत्रज्ञान. जप्त केलेल्या कारच्या पुढील व मागील नंबर प्लेटवर रिमोटने नियंत्रित होणारा काळा पडदा बसवण्यात आला होता. केवळ रिमोटच्या एका बटणावर अवघ्या काही सेकंदात नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात असे. वाहतूक पोलिस, नाकेबंदी व सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून वाचण्यासाठी तस्कर या तंत्रज्ञानाचा वापर करत होते.