

Fastag Wrong Deduction Complaint
सातपूर (नाशिक) : केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली सुलभ करण्यासाठी सुरू केलेली फास्टॅग प्रणाली नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीचे कारण ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहेत.
सातपूर येथील रहिवासी व भाजपचे पदाधिकारी गणेश बोलकर यांची इनोव्हा गाडी (एमएच १५, एफडब्ल्यू ७७०७) ही १३ जून रोजी दिवसभर घरासमोर उभी असताना रात्री १०:४० वाजता त्यांना मोबाइलवर निंबवली टोल प्लाझावरून ३२० रुपये फास्टॅगद्वारे वसूल झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांना धक्का बसला. या प्रकारामुळे फास्टॅग प्रणालीतील तांत्रिक त्रुटी अथवा अपारदर्शकता याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बोलकर यांनी तत्काळ फास्टॅगच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित क्रमांक वारंवार व्यग्र येत असल्यामुळे त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यानंतरही टोल अधिकाऱ्यांकडून किंवा फास्टॅगच्या ॲपवरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे व्यवहार झाल्यास नागरिकांनी लगेच फास्टॅग ॲप व वेबसाइटवरून तक्रार नोंदवावी. टोल प्लाझावरची त्यावेळेच्या सीसीटीव्ही फुटेजची मागवावी. बँक व पेमेंट पुराव्यांसह पोलिसांत तक्रार दाखल करावी.
गाडी घरी उभी असतानाही फास्टॅगमधून निंबवली टोल प्लाझासाठी 320 रुपये वळते झाल्याचा मेसेज मला रात्री 10.40 वाजता प्राप्त झाला. या नावाचा कोणताच टोलनाका अस्तित्वात नाही. सकाळी संबंधित ऑथॉरिटीशी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला असता उत्तर दिले जात नाही. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
गणेश बोलकर, भाजप शहर उपाध्यक्ष, नाशिक.