

येवला : तालुक्यातील रायते शिवारातील रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीजला शुक्रवारी पहाटे आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याने १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंदरसूल येथील शेतकरी कुटुंबातील विष्णू खैरनार, वैभव खैरनार यांनी तीन वर्षांपूर्वी रायते शिवारात रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीज उभी केली. जवळपास दीड एकर क्षेत्रातील या इंडस्ट्रीजला आग लागल्याने पहाटे पाच वाजता मजूर उठून बाहेर पडले. कंपनीत परराज्यातील ३५ ते ४० मजूर काम करतात. येवला येथील अग्निशामक दलाचे नितीन लोणारी यांनी आगीचे रौद्ररूप पाहताच मनमाड, कोपरगाव, चांदवड, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, निफाड अशा ठिकाणांहून अग्निशमन बंब बोलावले.
मात्र, चार अग्निशमन बंबांना देखील आग आटोक्यात आली नाही. पहाटे तीनला कंपनीला लागलेल्या आगीची तीव्रता दुपारपर्यंत होती. यात कंपनीतील कच्चा माल, तयार प्लायवूड, फेविकॉल, हायड्रोलिक ऑईल, इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी, पत्र्याचे शेड जळून खाक झाले. दीड एकरात विस्तार असलेली ही कंपनी महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर प्लायवूडचा पुरवठा करत होती. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.