

नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर भारत सरकारकडून पोलिस दलात उल्लेखनीय, गुणवत्ता पुरी करणाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलिस पदक' जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील पाच तर शहरातील दोन असे सात पाेलिस अधिकारी, अंमलदारांना पदक जाहीर झाले आहेत.
नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी यापूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालक पदकाला गवसणी घातली आहेत, त्यांच्यातून गुणवत्तापुर्ण सेवेतील पदकासाठी काही पोलिसांची नावे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी पाठविण्यात आली. त्यातून यावर्षी ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक बंडू बाबूराव ठाकरे, मोनिका सॅम्युअल थॉमस, हवालदार अरुण निवृत्ती खैरे, दीपक नारायण टिल्लू यांच्यासह शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू रामनाथ खुळे, उपनिरिक्षक गणेश मनाजी भामरे यांना गुणवत्तापूर्ण सेवाकार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
राजू सुर्वे १९९१ ला पाेलिस शिपाई पदावर कार्यरत होते. सरळ सेवाअंर्तगत २०१० मध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले. सातारा, मुबंईत खंडणी विराेधी पथक, गुन्हे शाखा, मानखूुर्द, खार, इगतपुरी पाेलिस ठाण्यात सेवा बजावली. मुंबईतील अंडरवल्डबाबतची माहिती, दाऊद इब्राईम, छाेटा शकील, रवि पूजारी, छाेटा राजन, सुरेश पुजारी या टाेळ्यांमधील १२५ सदस्यांविराेधात कारवाई ,दाेषाराेपपत्र दाखल केले. अनेक गुन्ह्यांची उकल केली. २ वेळा पाेलिस आयुक्त, १ पाेलिस महासंचालक मानचिन्ह मिळाले आहे. सध्या राजू संपत सुर्वे हे नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
दत्तु खुळे हे १९९० साली पोलिस दलात भरती झाले. त्यांनी नाशिकरोड, भद्रकाली, आडगाव, पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, एसीबी, आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. त्यांना नुकतीच उपनिरिक्षक पदावर नाशिक परिक्षेत्रात पदोन्नती मिळाली आहे. चोरीचे ७० गुन्हे, घरफोडीचे २५ गुन्हे उघडकीस आणून २१ लाख रूपयांचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे. ३३ वर्षांच्या सेवेत २८६ बक्षिसे व ५ प्रशंसापत्र त्यांनी मिळविले आहे. २०१६ साली महासंचालक सन्मानचिन्हसुद्धा त्यांना मिळाले होते.
गणेश भामरे १९९१ साली पोलिस दलात भरती झाले. ३३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पोलिस ठाण्यांत सेवा बजावली. त्यांना नुकतीच उपनिरिक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून ठाणे येथे त्यांची बदली झाली आहे. त्यांनी आयुक्तालय हद्दीत कर्तव्यावर १५ एमपीडीए प्रस्ताव, ०६ मोक्का प्रस्ताव सादर केले. चेन स्नॅचिंगचे १७ गुन्हे उघड केले. नार्कोटिक्स पथकात त्यांनी एमडी ड्रग्जचे रॅकेट शोधून २० कोटी रूपयांचे एमडी ड्रग्ज व २१ लाखांचा गांजा हस्तगत केला होता.