Nashik news | नाशिक शहर पुन्हा खड्डयांत जाणार

२९ रस्त्यांचे खोदकाम होणार सुरू
Dhule-Solapur Highway
Dhule-Solapur Highway : लाखोची टोल वसुली तरीही महामार्गावर खड्डे File Photo
Published on
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील २९ रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, डांबरीकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी या रस्त्यांच्या ठिकाणी जलवाहिन्या, मलवाहिका टाकण्यासाठी हे रस्ते खोदले जाणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी (एमएनजीएल) ने महापालिकेकडे २५० किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईची परवानगी मागितली आहे.

गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजना, अमृत २ अभियानांतर्गत मलवाहिका, जलवाहिन्या टाकण्याची कामे, मुकणे धरण थेट जलवाहिनीची कामे सुरू होणार असल्याने शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील २९ रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत.

तत्पूर्वी अस्तित्वातील रस्ते खोदून त्याठिकाणी मलवाहिका, जलवाहिन्या टाकण्याची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाला सादर केला आहे. त्याचबरोबर केंद्राच्या अमृत २ अभियानांतर्गत महापालिकेच्या २५० कोटींच्या मलवाहिका योजनेला मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत ८८ किलोमीटर लांबीच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी रस्ते खोदकामाला सुरुवात होत आहे.

याशिवाय नवीन जलवाहिन्यांची कामेही केली जात आहेत. त्यासाठी देखील रस्ते खोदले जात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून गंगापूर धरण ते बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान थेट जलवाहिनी टाकली जात आहे. यासाठी देखील रस्ते खोदले जात आहेत. मुकणे धरण विस्तारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विल्होळी ते साधुग्राम (तपोवन) दरम्यान थेट जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठीदेखील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यातच एमएनजीएल कंपनीने गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी आणखी २५० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत नाशिकककरांना खड्ड्यांतूनच मार्गक्रमण करावे लागण्याची शक्यता आहे.

'चांगल्या रस्त्यांसाठी धक्के सहन करा'

सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत प्राधिकरणामार्फत शहरात तब्बल २२०० कोटींची रस्ते विकासाची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी २९ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांची कामे सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी मलवाहिका, जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरात खड्ड्यांसह धुळीचे साम्राज्य पसरले आहेत. त्यात आता खड्ड्यांचे धक्के नाशिकककरांना सहन करावे लागणार आहेत. चांगल्या रस्त्यांसाठी धक्के सहन करावे लागतील, त्यानंतर मात्र नाशिककरांना चकाचक रस्ते मिळतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

66 सिंहस्थातील रस्ते कामांसाठी पोलिसांकडून परवानगी दिली जात असून, आवश्यक रस्तेच प्रथम खोदले जात आहे. तसेच 'एमएनजीएल 'नेही २५० किलोमीटर लांबीचे रस्ते फोडायची परवानगी मागितली आहे. त्यावर विचार सुरू आहे.

संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news