

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने सुरू केलेल्या 'जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' मोहिमेने गुन्हेगारांना अक्षरशः धडकी भरली असून अनेक सराईत गुन्हेगार शहरातून गायब झाले आहेत. काहींचे ठिकाण खाटू श्याम, तर काहींचे पर्यटनस्थळांपासून देवदर्शनापर्यंत पोहोचले. मात्र, या मोहिमेच्या धडाक्याने पळ काढलेल्या गुन्हेगारी जगतातील एका कथित 'भाऊ'ला अखेर नशिबाने साथ सोडली आणि तो थेट पोलिस आयुक्तालयातच लोटांगण घालण्यासाठी परतला. परंतु, आयुक्तालयातलं लोटांगण काही कामी आलं नाही.
गुलाबी थंडीने गारठलेल्या नाशिकमध्ये त्याचं मन उबदार होण्यासाठी एकच जागा होती. क्राइम ब्रांच युनिट १ चे 'खास पाहुणचारगृह'. तिथेच त्याची योग्य सोय करण्यात आली, अशी मोठी चर्चा रंगली आहे.
दोन महिन्यांपासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेने अनेकांचे गुन्हेगारी साम्राज्य अक्षरशः धुळीला मिळवले. काहींना गुडघ्यावर बसवून आत्मसमर्पण करवले, तर काही स्वेच्छेने 'शरण' आले. पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीत काही विद्यमान नगरसेवक आणि काही निवडणूक इच्छुकांचीही नावे असल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली होती.
कामगार वस्तीतील हा कथित 'भाऊ'ही त्याच भीतीच्या छायेत शहरातून लपून बसला होता. मात्र, मनपा निवडणुकांची चाहूल लागताच त्याची 'डिझेल' संपल्यासारखी स्थिती झाली. निवडणूक लढवायची तर आधी आयुक्तांसमोर माथा टेकणं अपरिहार्य, म्हणून तो परतला. पण संधी हातातून निसटलीच. क्राइम ब्रांच युनिट- १ च्या पथकाने त्याला अगदी अलगद तावडीत घेतलं. विशेष म्हणजे, खुनाच्या गंभीर आरोपातून निर्दोष सुटल्यावर त्याने एके काळी ५० गाड्यांचा लवाजमा घेऊन 'वणी दर्शन' केल्याची कथा शहरात प्रसिद्ध होती. त्या ऐटीत मिरवणाऱ्या या व्यक्तीला आता पोलिस यंत्रणेची दारं ठोठावण्याशिवाय पर्याय उरला नाही, हेच आजच्या परिस्थितीचं चित्र स्पष्ट दाखवत आहे.