

नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षण विभागापाठोपाठ आदिवासी विकास विभागाने खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक संचमान्यतेचा सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी, आठवी, दहावी व बारावीपर्यंत विद्यार्थी संख्येच्या आधारे यापुढे शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची पदे मंजूर करण्यात येणार आहेत.
संच मान्यतेच्या अटी व शर्ती
आश्रमशाळांनी 16 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी संख्या निश्चित करणे
31 ऑगस्टपर्यंत प्रकल्प अधिकारी हे अपर आयुक्तांकडे संच मान्यतेचा प्रस्ताव पाठवतील
अपर आयुक्त हे 15 ऑक्टोबरपर्यंत संचमान्यता मंजुरी प्रदान करतील
15 नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
30 नोव्हेंबरपर्यंत पदांचा गोषवारा सादर होईल
15 डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर करण्यात येईल
राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत 552 अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख 52 हजार 778 विद्यार्थी शिक्षण घेतात. राज्यात 490 शासकीय वसतिगृहांमध्ये 58 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षण पदे मंजूर करण्यात येणार आहेत. एकाच वर्गात अधिक शिक्षक असल्यास शिक्षक पदे मंजूर करण्याबाबत सुधारित निकष लागू केले आहेत. इयत्ता पहिली ते पाचवी, पहिली ते सातवी - आठवी, पहिली ते दहावी व पहिली ते बारावी या वर्गांसाठी विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक, मुख्याध्यापक व इतर पदांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही व कार्यकाळही ठरवून दिल्यामुळे आता संचमान्यता करणे शक्य होईल.
शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक पदे निश्चित झाल्यानंतर, पहिली ते आठवीपर्यंत 150 विद्यार्थी संख्या असेल, तर एक मुख्याध्यापक कार्यरत राहू शकतो. तसेच, पहिली ते दहावीपर्यंत 150 विद्यार्थ्यांसाठी एक उपमुख्याध्यापक व 31 शिक्षक नियुक्त करण्यात येतील. शिक्षकांच्या संख्येनुसार पर्यवेक्षकांची संख्या निश्चित होईल, तर पहिली ते बारावीपर्यंत 251 ते 500 विद्यार्थी असतील, तर एकच क्रीडाशिक्षक पद मंजूर करण्यात आले आहे. कला, संगीत, कार्यानुभव या शिक्षकांच्या पदांसाठी नवीन निकष लागू केले आहेत.
प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी)
विद्यार्थी संख्या - मंजूर शिक्षक
1 ते 20 – 1
21 ते 60 – 2
61 ते 90 – 3
91 ते 120 – 4
121 ते 150 – 5
151 ते 180 – 6
181 ते 210 – 7
211 ते 250 – 8 (211 विद्यार्थी संख्येपासून, प्रती 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक)
प्राथमिक शाळा (पहिली ते आठवी)
विद्यार्थी संख्या - मंजूर शिक्षक
10 ते 35 – 1
36 ते 70 – 2
71 ते 105 – 3 (105 च्या पुढे, प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक)
माध्यमिक शाळा (नववी ते दहावी)
विद्यार्थी संख्या - मंजूर शिक्षक
40 ते 100 – 3
101 ते 140 – 4
141 ते 180 – 5
181 ते 220 – 6 (221च्या पुढे, प्रती 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक)