

दिंडोरी : कादवाच्या थकबाकीदार भाग भांडवलदारांचे शेअर्स सभासदांना विश्वासात संचालक मंडळाने आपल्या मर्जीतील लोकांना देण्याचा सपाटा सुरू केल्याचा आरोप सहकार नेते सुरेश डोखळे, सचिन बर्डे व ऊस उत्पादक सभासदांनी केला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. डोखळे म्हणाले की, सन 2023-2024 च्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा विषय क्रमांक 13 च्या अनुषंगाने थकीत भाग भांडवलधारकांचे भाग जमा करून घेण्याचा ठराव आवाजी मताने पारित केला होता. त्या सभेच्या इतिवृत्ताची माहिती ऊस उत्पादक सभासद सचिन बर्डे यांनी दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी लेखी अर्जाद्वारे कादवा व्यवस्थापनाकडे मागितली होती. मात्र, ती प्रत संचालक मंडळाने दिली नाही. त्यानंतर दि. 30 जानेवारी 2025 ला प्रादेशिक सरसंचालक (अहिल्यानगर) यांना पत्र देऊन सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत मिळविण्याकरिता विनंती केली होती. परंतु, त्यांच्या आदेशालाही संचालक मंडळाने केराची टोपली दाखवली. त्यामुळे बर्डे यांनी गुरुवारी (दि. 6) सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत न मिळाल्यास ऊस उत्पादक सभासदांसह कारखाना कार्यस्थळावर उपोषणाचा इशारा दिल्याने संचालक मंडळाने शनिवारी (दि. 8) त्यांना इतिवृत्ताची प्रत दिली. इतिवृत्तात थकीत भाग भांडवलधारकांचे शेअर्स जमा करताना एकूण 17 हजार भाग भांडवलधारक असणार्या सभासदांपैकी सर्वसाधारण सभेला फक्त 1,635 भागधारक उपस्थित असताना हा ठराव पारित केल्याचे समोर आले. याबाबत ऊस उत्पादक सभासदांनी माहिती घेतली असता, काही संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आगामी निवडणुकीकरिता हा सर्व राजकीय डावपेच असल्याचे कबूल केल्याचा दावा करतानाच, या संबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा पुनरुच्चार बर्डे यांनी केला.
सुरेश डोखळे म्हणाले की, थकीत भाग भांडवलधारकांचे जे भाग जमा करून घेण्यात आले, ते चुकीचे आहे. या गोष्टीला विरोध करून किमान त्यांना एक ते दोन वर्षांची मुदत देऊन थकीत रक्कम जमा करून घ्यावी, असे आवाहन केले होते. मात्र, संचालक मंडळाने सर्व थकीत भाग भांडवलधारकांंचे भाग जमा करून त्या भाग भांडवलाची गुपचूप विक्री सुरू केल्याचा आरोप केला आहे. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कायद्याने व नियमाने जे अधिकार दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी संचालक मंडळाची आहे. आजमितीला आठ कोटी भाग भांडवल येणे थकीत आहे. भाग भांडवलावर कर्ज मिळते, त्यामुळे भाग भांडवल जमा करणे गरजेचे आहे, संबंधितांना वारंवार नोटिसा दिल्या, वृत्तपत्रात जाहिराती दिल्या, काहींनी पैसे भरले, तर काहींनी भरले नाही. २०23-24 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत खूलासा केला होता. विरोधकांचे आरोप म्हणजे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा कारखाना