

नाशिक : गंगापूर आणि मुकणे धरणवरील पंपींग स्टेशनच्या विद्युत कामांमुळे येत्या शनिवारी (दि. १) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. रविवारी (दि. २) सकाळच्या पाणीपुरवठ्यात कमी दाबाने आणि कमी वेळेचं पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
शहराला प्रामुख्याने गंगापूर आणि मुकणे धरण व अल्प प्रमाणात दारणा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणावर महापालिकेच्या पंपीग स्टेशनकरीता महावितरणच्या १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ केव्ही उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात येतो. सदर पंपींग स्टेशनद्वारे महापालिकेच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करणेत येतो. त्याचप्रमाणे मुकणे येथील पंपीग स्टेशनला गोंदे येथील महावितरणच्या रेमण्ड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेकरीता ३३ केव्ही वीज पुरवठा केला जातो. गंगापूर धरण येथे नवीन थेट जलवाहिनीअंतर्गत नवीन पंपीग स्टेशन उभारण्याकरीता काम सुरू करण्यात आले आहे. या कामात अडचणीच्या ठरणाऱ्या ३३ केव्ही दाबाच्या वीज वाहिनीचे शिफ्टींग करणे तसेच सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे शनिवारी (दि.१) हाती घेतली जाणार आहेत. मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे देखील हाती घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार विविध जलशुध्दीकरण केंद्रांतील सबस्टेशनमधील कामे, स्मार्ट सिटी अंतर्गत शट डाऊन व फ्लो मीटर बसविणे यामुळे गंगापुर व मुकणे धरणातून पंपींग करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा थांबणार आहे, आणि रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळवले आहे.