

सिडको (नाशिक): पॅन कार्ड २.० हे अतिशय गतिमान व अधिक सुरक्षितता प्रदान करणारे कार्ड असणार आहे. करदात्यांचा सध्याचा असलेला क्रमांक बदलणार नाही, पण पॅन कार्डमध्ये गतिमान क्यूआर कोडचा समावेश झाल्याने या क्युआर कोडव्दारे जलद प्रतिसाद प्राप्त होणार आहे.
पॅन कार्डधारक करदात्याची बाबतची माहिती लगेचच उपलब्ध होणार असल्याने हा अतिशय महत्त्वपूर्ण बदल असून प्रत्येक पॅन कार्डधारकांनी नवीन प्रणालीतील पॅन कार्ड २.० घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभाई यांनी केले.
सुधारित पॅन कार्ड फॉर्ममध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक बदल पॅन कार्ड अर्जाच्या फॉर्म 49ए व 49एए मध्ये करण्यात आले आहेत. 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या सर्व महाराष्ट्रीयन व्यक्तींना वडिलांच्या व आईचे प्रथम नाव त्याच्या नावात असण्याची अनिवार्यता स्पष्ट करण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नवीन पॅन कार्ड २.० प्रणालीमध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि फसवणुकीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अनिवार्य आधार लिंकेज, रिअल-टाइम डेटा व्हॅलिडेशन आणि प्रगत विश्लेषण यासारख्या प्रमुख सुधारणांचा समावेश आहे. पॅन २.० चे प्राथमिक उद्दिष्ट पूर्णपणे कागदविरहित, सुव्यवस्थित आणि तंत्रज्ञान-चालित प्रक्रियेकडे वाटचाल करून पॅन कार्ड प्रणालीला डिजिटल सुविधा देणे, हा आहे. हा प्रकल्प सरकारच्या व्यापक डिजिटल इंडिया व्हिजनशी सुसंगत आहे. सेवा वितरणात सुधारणा, चांगली सुरक्षा सुनिश्चित करणे आणि करदात्यांना एक अखंड डिजिटल अनुभव प्रदान करणे आहे, हे या व्हीजनचे उद्दीष्ट आहे. पॅन कार्ड २.० हे मिळविण्यासाठी सरकारी संकेतस्थळावर निशुल्क मिळणार आहे. मात्र, अन्य एजेन्सीव्दारे घेतल्यास ते सशुल्क असणार आहे, असे सातभाई यांनी स्पष्ट केले.