

इंदिरानगर (नाशिक) : राजीवनगर येथील मशिदीला महापालिकेने नोटीस बजावली असून, पोलिसांच्या सूचनेनुसार नुराणी अंजुमन ट्रस्टने ’नुराणी सुन्नी मस्जिद’ या नावाचा फलक हटवून मशिदीला कुलूप लावले आहे. याठिकाणी धार्मिक प्रार्थनाही थांबवण्यात आली आहे. ही मशीद अनधिकृत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांसह हिंदू जनसंपर्क कार्यालय, इच्छापूर्ती गणेश मंडळाने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मशिदीला इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला महापालिकेने 9 फेब्रुवारी 2000 रोजी दिला होता. त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, संबंधित इमारतीचा वापर कोणत्याही धार्मिक कार्यासाठी करता येणार नाही. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी मुस्लीम समुदायाच्या वतीने नमाजपठण केले जात होते. रहिवाशांच्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी महापालिकेने या अनधिकृत मशिदीला नोटीस दिली. पोलिसांनी सूचना दिल्यानंतर ट्रस्टने मशिदीवरील फलक हटविला तसेच कुलूप लावले. पोलिसांच्या कारवाईवेळी परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते.