

नाशिक :स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला असून, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय पथक पुढील आठवड्यात बदलापूर पोलिसांना भेटणार आहे. बदलापूर पोलिसांकडील स्त्री बीज तस्करी प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून, या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकशी जुळतात का, याविषयीची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आठ पथकांमार्फत शहरातील सर्व आयव्हीएफ केंद्रांची तपासणी केली असून, यात प्रथमदर्शनी कुठलाही गैरप्रकार आढळला नसल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय देवकर यांनी केला आहे.
स्त्री बीज नाशिकमधून बदलापूरला नेण्यात आले होते का? स्त्री बीज काढण्याची प्रक्रिया कुठे झाली? नाशिकमधील किती महिलांचे, किती वेळा स्त्री बीज घेण्यात आले. एकाच महिलेकडून वारंवार स्त्री बीज घेण्यात आले होते का याची तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत केली जाणार असून, यात बदलापूरप्रमाणे काही गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रावरदेखील गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे मालती आयव्हीएफ केंद्राचा पाय खोलात आहे.
महानगरपालिका हद्दीत असलेल्या मालती आयव्हीएफ सेंटरच्या व्यवस्थापना विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य आरोग्य विभागाने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने गोविंदनगर येथील बेला व्हिस्टा इमारतीतील मालती आयव्हीएफ केंद्रावर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली होती. ४ मार्च रोजी केंद्राची नोंदणी रद्द करून ते सील करण्यात आले. मनपाने नाशिकसाठी केंद्र मंजूर केले असताना, त्याचा वापर बदलापूर येथे केला जात होता. त्यामुळे महापालिकेने या घटनेच्या उर्वरित २४ आयव्हीएफ केंद्रांची सखोल तपासणी केली गेली.
बदलापूर येथील प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. बदलापूर पोलिसांकडे डॉ. अमोल पाटील यांच्याशी संबंधित रेकॉर्ड मागविण्यात आले होते. परंतु त्यास विलंब होत असल्याने पथकाने बदलापूर येथे प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्याचा निर्णय आहे.