

निफाड : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशांवर अवाजवी व्याजाची मागणी करत, जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या एका इसमाविरुद्ध निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अनिता सुनील खरात (वय ३६, रा. गायत्रीनगर, निफाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाऊसाहेब पंडित बोरगुडे (रा. नैताळे, ता. निफाड) याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिता खरात यांचा साड्या विक्रीचा व्यवसाय असून, व्यवसायासाठी भांडवलाची गरज भासल्याने त्यांनी २०२४ मध्ये संशयित आरोपी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. खरात यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी घेतलेल्या कर्जापोटी मुद्दल आणि व्याजासह मोठी रक्कम वेळोवेळी परत केली होती. मात्र, आरोपीने अधिक पैशांची मागणी लावून धरली होती. काही रक्कम परत करण्यास उशीर झाल्याने आरोपीने तक्रारदार आणि त्यांच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच, व्याजाच्या पैशांसाठी तक्रारदाराकडून काही कोऱ्या कागदपत्रांवर आणि धनादेशावर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, कर्जाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी पीडितेवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला होता. या जाचाला कंटाळून अखेर खरात यांनी निफाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.