

नाशिक : महावितरणने नवीन कार्यप्रणाली अंगीकृत केली असून, आगामी काळात मुबलक वीजसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेषत: औद्योगिक ग्राहकाला सदैव प्राधान्य दिले जाणार आहे.
विजेमुळे उद्योजकांच्या उत्पादन प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होऊ दिला जाणार नाही. उद्योजकांचे होत असलेल्या नुकसानीची जाणीव ठेवत, आपसातील संवाद वाढविण्याची गरज आहे. येत्या काळात नाशिक सक्षम ऊर्जाशील करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली
विभागीय कार्यालय येथे बैठकीसाठी आलेल्या लोकेश चंद्रा यांची भेट निमा व आयमा पदाधिकाऱ्यांनी घेतली. बैठकीला संचालक मंडळ, कोकण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी सातपूर व अंबड या औद्योगिक वसाहतींसाठी उभारलेली वीजवितरण प्रणाली ५० वर्षे जुनी झाल्यामुळे उद्योजकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी उभारलेले विजेचे खांब जीर्ण झाले आहेत. त्यामुळे अखंड वीजपुरवठा होत नसल्यामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. अशात तत्काळ औद्योगिक सबस्टेशनची क्षमता वाढविण्याची गरज असल्याची मागणी केली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीसाठी निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, आयमा उपाध्यक्ष उमेश कोठावदे, गोविंद झा, हर्षद बेळे, ऊर्जा समिती अध्यक्ष मिलिंद राजपूत, कैलास पाटील आदी उपस्थित होते.