नाशिक : दिलीप सूर्यवंशी
वाहनांची वाढती संख्या, अपुरे रस्ते, नियोजनाचा अभाव, वाढते अतिक्रमण, फ्लायओव्हर, अंडरपासची गरज आदी कारणांमुळे दिवसेंदिवस शहराचा श्वास कोंडला जात असून, वाहतूक कोंडीच्या विळख्यात नाशिककर अडकत आहेत. या समस्यांमधून मुक्त होण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय असायला हवा. त्याचवेळी विकसित नाशिकचे स्वप्न पाहताना शहराला आता फ्लायओव्हर आणि अंडरपासची गरज राजकीय इच्छाशक्तींनी ओळखणे गरजेचे आहे. ही गरज पूर्ण झाली, तरच आगामी काळात विकासाच्या कसोटीवर नाशिक टिकू शकेल.
मुंबई- पुणे- नाशिक हा विकासाचा सुवर्णत्रिकोण साध्य करण्यासाठी नाशिकचा विकास वेगाने होत आहे. विकासाच्या नाड्या असलेले रस्ते हे सुस्थितीत आणि आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहेत. सध्या नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण करताना मुंबई नाका परिसरात महामार्गाला सिमेंट रस्त्यात बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी सकाळपासून सायंकाळपर्यंत मुंबई नाक्यापासून कालिका मंदिरापर्यंत अन सर्व्हिस रोडवर छान हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.
द्वारका सर्कल येथे सारडा सर्कल परिसरात उर्दू हायस्कूल असल्याने शाळा सुटण्याची अन् भरण्याची एकच वेळ असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. द्वारका अन् सारडा सर्कल येथे एकाच वेळी वाहतूक कोंडी झाल्यास दोन्ही बाजूंनी रस्ता काढताना वाहनधारक हतबल होतात. शहर वाहतूक पोलिस आणि महानगरपलिकेने समन्वयाने या समस्येवर मार्ग काढावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पंचवटी आणि एम.जी रोड, शालिमार, अशोकस्तंभाला जोडणार्या रविवार कारंजा परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वर्षानुवर्षे या समस्येने रविवार कारंजाला ग्रासलेले आहे. अतिक्रमणे थेट रस्त्यावर असल्याने बसेस, चारचाकी वाहने, दुचाकींना आरके सर्कलजवळून जाताना दिव्यत्व पार करावे लागते. रविवार कारंजा येथून चांदीच्या गणपतीपासून मेन रोडकडे येताना रस्त्यातच रिक्षाचालकांनी ठाण मांडलेले असते. त्यामुळे येथे कायम कोंडी होत असते.
नाशिकच्या विकासाचे द्योतक असलेल्या फ्लायओव्हरखाली इंदिरानगर परिसरात अंडरपासची गरज आहे. याठिकाणी सकाळी 10 पासून दुपारी 1 पर्यंत वाहनांना पास होण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. फ्लायओव्हरखाली 3 ते 4 वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे. वाहतूक नियंत्रित करताना वाहतूक पोलिसही हतबल होतात.
एकीकडे नाशिक शहराचा विकास वेगाने होत असताना शहर अतिक्रमण अन वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडत आहे. अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी शहर पोलिस दल आणि महापालिकेने समन्वयाने कारभार करणे अपेक्षित आहे. तर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहराला फ्लायओव्हर, अंडरपासची गरज भेडसावत आहे.
आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक नाशिकला भेट देणार आहेत. अशावेळी शहरातील कोंडीमुक्त वाहतूक, आधुनिक सिग्नल्स यंत्रणा, अतिक्रमणमुक्त शहर या संकल्पना युद्धपातळीवर राबविणे आवश्यक आहे. यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून काम करणे आवश्यक आहे. तरच शहराला वाहतूक कोंडी, अतिक्रमण यांसारख्या समस्यांमधून मुक्त करता येईल.