

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतील निर्देशकांवर आधारित मे महिन्यातील जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) व जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) संवर्गातील राज्यस्तरावर गुणांकन तयार करण्यात आले आहे. त्यात जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातून नाशिकचा पहिला क्रमांक आला आहे. या गुणांकनाची २५ जुलैला घोषणा झाली. (National Health Programme)
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत (National Health Programme) मातृ स्वास्थ्य, मुलाचे आरोग्य, कुटुंबनियोजन, लसीकरण, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, किशोरवयीन आरोग्य, रेबिज नियंत्रण कार्यक्रम, आशा कार्यक्रम, प्रशासन, मोफत निदान सेवा यांसह एकूण ३० निर्देशकांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी करण्यात आली. त्यानुसार मे महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर नाशिक जिल्ह्याने ४०.८५ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल वाशिम (४०.६६), कोल्हापूर (३९.३८), अकोला (३७.८०), हिंगोली (३७.९५) या जिल्हा शल्यचिकित्सकांना अनुक्रमे २ ते ५ क्रमांक मिळाले आहेत.
१० महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हा शल्यचिकित्सकांचा २८ वा क्रमांक होता. मात्र, आम्ही सांघिक कामाच्या जोरावर १० महिन्यांत सुधारणा करीत पहिला क्रमांक गाठला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे. ज्या तालुक्यांमध्ये या आधी प्रसूती, शस्त्रक्रिया झाल्या नव्हत्या तेथे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णांना त्यांच्याच तालुक्यात आरोग्य सुविधा मिळत आहेत. भविष्यात या सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यावर भर राहील.
डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा रुग्णालय.