चांदवड : विजेचा धक्का बसल्याने शेतकरी विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना परसूल गावात शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३ च्या सुमारास घडली.
याप्रकरणी चांदवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परसूल येथे सचिन वाघ हे पत्नी रोहिणी (२६) यांच्यासमवेत शेतात काम करीत होते. यावेळी विहिरीवरील कृषिपंपाच्या स्टार्टरच्या लोखंडी पेटीला रोहिणी यांनी स्पर्श केला असता त्यातून त्यांना विजेचा धक्का बसला. त्या बेशुद्ध झाल्या. सचिन यांनी त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. मृताच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू-सासरे असा परिवार आहे.