Nashik News | अनेकांचे लक्ष फक्त टेंडरवरच ... भुजबळ संतापले

Simhastha Kumbh Mela Nashik : भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; सरकारला घरचा आहेर
नाशिक
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Summary

अनेकांचे लक्ष केवळ टेंडरवरच असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत गोदावरी नदी स्वच्छ करा बाकी काही नाही केले तरी चालेल, असा टोला भुजबळांनी दिला आहे. भुजबळांचा नेमका रोख कुणावर, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी प्रलंबित सिंहस्थ कामांविषयी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या १६ हजार कोटींच्या सिंहस्थ आराखड्यावरून भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांचा नामोल्लख न करता सुनावले. इतका निधी कोण देईल, असा प्रश्न त्यांनी केला. आगामी सिंहस्थासाठी नवीन वळण रस्त्यांचे नियोजन करण्यात आले, मात्र कधी भुसंपादन होईल, कधी निधी मिळेल, कधी काम होईल, हे माहिती नाही. मुळात अंतर्गत आणि बाह्य वळण रस्ते तयार आहेत. जिथे तो खराब असेल तिथे दुरूस्त करता येईल. गोदावरी नदीची स्वच्छता केली तरी सिंहस्थ कुंभमेळा आपोआप चांगला होईल. फारसे काही करण्याची गरज नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर तसेच शिर्डीकडे जाणारा रस्ताही तयार आहे. गोदावरी नदी घाट तयार आहेत. साफसफाई व व्यवस्था उभारणीला प्राधान्य द्यायला हवे. परंतु अनेकांचे लक्ष सिंहस्थ कामांच्या टेंडरकडेच असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला. सध्या स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांपैकी काहींना आपले कर्तव्यही माहित नाही. त्यांना केवळ आणून बसवले आहे. साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन, पादचारी आणि वाहनांना अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई, यासारखी साधी कामेही करता येत नाहीत, अशा शब्दांत प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही भुजबळांनी टीकास्त्र सोडले.

कृषीमंत्री कोकाटेंना कानपिचक्या

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी राजीनामा दिल्याप्रकरणी भुजबळांनी कृषीमंत्री कोकाटे यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक वाचली पाहिजे, असे नमूद करत राजकीय नेत्यांनी आपले लहान फायदे बाजुला ठेवले पाहिजेत. बँक कशी वाचेल, याचाच विचार केला पाहीजे, असा टोला त्यांनी लगावला. ज्या पध्दतीने वसुलीला स्थगिती देण्यात आली. व्याज माफ करावे, अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे वसुलीच्या कामकाजात अडथळे आले. त्यामुळे आपण टार्गेट पूर्ण करू शकणार नाही, अशी भावना झाल्याने प्रशासकांनी राजीनामा दिला, असा दावा भुजबळ यांनी केला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना टोला

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. नाशिकला पालकमंत्री नसल्याने काहीही अडत नाही. कारण नियोजन, अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणाच असते. अधिकारी व्यवस्थित काम करणारे असायला हवेत. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी कोणी चाकू हातात घेतला तर गावभर चर्चा व्हायची आता त्याची सवय झाली आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांची भूमिका यात महत्वाची असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news