नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तपदासाठी सातत्याने नाव चर्चेत असलेल्या नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकारणच्या (एनएमआरडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) डॉ. राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.
आयुक्तपदी असलेल्या सतीशकुमार खडके यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत उन्नत करून नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त यांच्या सल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार आयुक्त खडके यांच्याकडून त्वरीत स्विकारावा असे बदली आदेशात म्हटले आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी खडके यांची एनएमआरडीए आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. एनएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. प्राधिकरणाला अधिकाधिक मसहूल प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. घोटी, इगपूरी, त्र्यंबकेश्वर आदी भागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकाम तसेच रिसॉर्टवर त्यांनी कारवाई करून अनधिकृत बांधकामांना चाप बसविला. दरम्यान, खडके यांनी अद्यापपर्यंत मनीषा खत्री यांच्याकडे पदभार दिलेला नाही. मनीषा खत्री या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूर येथे अप्पर आयुक्त आदिवासी, अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी या पदांवर काम केले आहे.
मनीषा खत्री या मुळच्या हरियाणा राज्यातील सोनीपत येथील आहेत. यापूर्वी त्यांनी मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यसंदर्भात विशेष उपक्रम राबविले आहेत. या बदलीमुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि एनएमआरडीए आयुक्त मनीषा खत्री हे दाम्पत्य नाशिकमध्ये आले आहेत.