

लासलगाव ( नाशिक ) : लासलगाव येथील शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा गेले चार महिने बंद असून संपूर्ण परिसर अंधारात राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित हेडअंतर्गत वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने पुरवठा खंडित केला. दररोज येथे येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे कामकाज नियमित सुरू असते, मात्र वीज नसल्याने मोबाईलच्या उजेडातच काम भागवावे लागत असल्याची स्थिती आहे.
रात्री विश्रामगृह परिसर पूर्ण काळोखात बुडत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत. परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे विषारी सापांचा वावर वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे सर्वांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागत आहे.
विशेष म्हणजे, हे विश्रामगृह नामदार छगनराव भुजबळ यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या गावात असूनही केवळ वीज बिल थकलेल्या कारणाने अशा प्रकारे शासकीय सेवेला अडथळा निर्माण झाला आहे.
संबंधित हेडअंतर्गत निधी उपलब्ध नसल्याने वीज बिल अदा करता आले नाही. निधी उपलब्ध होताच बिल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
गणेश चौधरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाड
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा तातडीने सुरू करावा आणि शासकीय विभागांनी नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करून शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
शासकीय विश्रामगृह म्हणजे जनतेची सुविधा. तीच अंधारात ठेवणे म्हणजे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यासारखे आहे. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा.
विलास डांगे, सामाजिक कार्यकर्ते, टाकळी विंचूर