

इंदिरानगर प्रतिनिधी : पाथर्डी फाटा परिसरातील आनंद अँग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकन मध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीवघेणी कंपनीच्या नाशिक शहरातील सर्व आऊटलेट बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रो चिकन विक्रीचे दुकान बंद करत संताप व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यातील नामांकित असलेल्या आनंद अँग्रो कंपनीच्या पोल्ट्री फार्म निर्मित प्रो चिकनचे नाशिक शहरासह जिल्हाभर आउट लेट आहेत. यापैकी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या आनंद अँग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानातून इश्वर माळी हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान चिकन घेण्यासाठी गेले आणि त्यांनी तेथून चिकन देखिल घेतले. मात्र या चिकन मध्ये चक्क आळ्या निघाल्या. त्यानंतर त्यांनी तेच आळ्यायुक्त चिकन जेथून घेतले तेथे दाखविण्यासाठी गेले. याचे वृत्त शहरभर पसरताच या कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
दरम्यान या जीवघेण्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या आनंद अँग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानावर शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर येथील आऊटलेट येथे जावून चिकन विक्रीसाठी बंदी केली. यावेळी उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी श्रुती नाईक, द्वाराका गोसावी, सुनीता रोटे, भाग्यश्री जाधव, प्रगती सोनार, अश्विनी बाविस्कर, अलका गायकवाड व विमल गिते आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
प्रो. चिकन च्या पाथर्डी फाटा येथील दुकानात चक्क किडे सापडले. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून समस्त नाशिक शहरातील प्रो चिकनाच्या दुकानांची पाहणी करीत हे दुकान बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर याबाबत काही राजकीय हस्तक्षेप होत असून या दुकानांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र आम्ही नाशिकचे नावं इतर शहरवासियांमध्ये खराब होऊ देणार नाही. स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.
श्रुती नाईक (उबाठा गट महिला पदाधिकारी)