

नाशिक : जिल्हा परिषद शाळांचे दुसरे सत्र सुरू होऊनही शाळांमध्ये कॅमेरे नसल्याने या सत्रातही विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावरच राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 3,257 शाळांपैकी केवळ 149 शाळांमध्ये कॅमेरे बसविलेले आहेत. उर्वरित 3,108 शाळांमध्ये कॅमेरेच नसल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील बदलापूर येथे बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याची मागणी होऊ लागली. जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला दोन वेळा स्मरणपत्रे पाठविली. मात्र निधी नसल्याने शासन स्तरावर याबाबत उदासीनता आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या एकूण 3,257 शाळांमध्ये वर्गखोल्यांची संख्या 12,780 इतकी आहेत. त्यापैकी केवळ 149 शाळांमध्ये 451 कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उर्वरित 3,108 शाळांमध्ये 12,319 कॅमेर्यांची आवश्यकता असून, यासाठी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कॅमेरे बसविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यासाठी निधीची मागणी केली. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा 1 ऑक्टोबर 2024 रोजी स्मरणपत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली.
बागलाण, दिंडोरी, मालेगाव, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांत सर्वात जास्त कॅमेर्यांची आवश्यकता असून, त्या खालोखाल चांदवड, देवळा, नांदगाव, नाशिक सिन्नर, पेठमध्ये कॅमेरे बसविणे आवश्यक आहे.