

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार्या जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणार्या कामांची देयके अदा करण्यासाठी निधीची कमतरता असल्याने कंत्राटदार अन् ठेकेदारांची कोट्यावधीची बिले ऐन दिवाळीत रखडली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यात ‘हर घर जल’ पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. झपाट्याने विकासकामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदार आणि कंत्राटदार यांची नेमणूक करुन विकासकामे पूर्ण करण्यात येत आहे. मात्र महायुती सरकारने जलजीवन मिशनचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविल्याने ठेकदार आणि कंत्राटदार यांना देयके अदा करण्यासाठी निधीच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या खेटा घालूनही ठेकेदार अन् कंत्राटदार यांना देयके मिळत नसल्याचे समोर आले आहे. ऐन दिवाळीत देयके अदा करण्यासाठी निधी शिल्लक नसल्याने दिवाळी साजरी कशी करायची अन् उर्वरीत विकासकामे कशी पूर्ण करायची असा प्रश्न ठेकेदारांना पडला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्याचा विचार करता ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 1296 गावांसाठी 1222 योजना मंजूर करण्यात आल्या. 1222 योजनांपैकी रेट्रोफिटींग (जुन्या योजना) 681 असून नवीन योजना 541 आहेत.
1222 पैकी 799 कामे पूर्ण झाले असून 423 कामे प्रगतीपथावर आहेत. जलजीवन मिशनवर आतापर्यंत एकूण 79 हजार 163 लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे. 1222 योजनांवर 56.14 ट़क्के खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नांदगाव, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या भागात 80 ट़क्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पूर्ण झालेल्या कामांची सुमारे 30 कोटींची देयके अदा करण्यासाठी निधीच शिल्लक नसल्याने ठेकेदार चिंतेत पडले आहेत.