

नाशिक : महायुती सरकारच्या येत्या गुरूवारी (दि.५) होणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून भाजपच्या २८० पदाधिकारी व निवडक कार्यकर्त्यांना पक्षाकडून निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने पक्षासाठी झटलेल्या जुन्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचा आनंद घेता यावा, यासाठी हे खास नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला छप्परफाड यश लाभले. सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला. मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला ५७ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. बुधवारी (दि.४) भाजपचा विधीमंडळ गटनेता निवडला जाणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे कळू शकणार आहे. यानंतर गुरूवारी (दि.५) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा महाशपथविधी वानखेडे स्टेडीयमवर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महायुतीमध्ये भाजप मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत उत्सुकता आहे. त्याला कारण म्हणजे १९९६, २०१४ व २०१९ मध्ये भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. यातील २०१४ वगळता पक्षाचा मुख्यमंत्री झालेला नाही. आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याने पक्षाचे पदाधिकारी व जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, माजी आमदार व खासदार सहकार क्षेत्रातील मान्यवर, माजी नगरसेवक त्याचप्रमाणे पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना विशेष निमंत्रित पास देण्यात आले आहेत.
भाजपसाठी मुख्यमंत्री शपथविधी सोहळा भावनेचा विषय आहे. भाजपने आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक १३२ जागा जिंकून विक्रम केला आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही हा सोहळा याची देही याचि डोळा अनुभवता यावा, यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
- नाना शिलेदार, सरचिटणीस, भाजप