

मनमाड (नाशिक) : मनमाडजवळील भूमिगत पेट्रोलियम पाइपलाइनमध्ये छेडछाड करून इंधन चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छडा नाशिक ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक झाली असून, तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शेतमालकाचाही समावेश आहे. चोरट्यांनी किती प्रमाणात इंधन चोरले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अनकवाडे शिवारातून मुंबई - मनमाड - बिजवासन उच्च दाबाची भूमिगत पेट्रोलियम पाइपलाइन गेली आहे. बीपीसीएल इन्स्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी ६ मे रोजी पाइपलाइनची डीसीव्हीजी मशीनद्वारे तपासणी केली. त्यावेळी पाइपलाइन कोटींगमध्ये छेडछाड आढळली. एका ठिकाणी छिद्र आढळून आले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केल्यानंतर इंधन चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर प्रकाराचा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पथक नेमून तपास सुरू केला. साधारण महिनाभराच्या प्रयत्नांनंतर पथकाने ५ जून रोजी सुनील ऊर्फ सोनू जयशंकर तिवारी (३५, रा. कल्याण, जि. ठाणे), कथुरायन ऊर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (३८, रा.गोवंडी, मुंबई) या दोघांना अनकवाडे शिवारातील (ता. नांदगाव) पोल्ट्रीचालक काकासाहेब शिवराम गरूड यांच्या फार्ममधून पकडले. दोघांकडील सखोल चौकशीतून मोहमंद मकसूद अब्दुल वाहीद शेख (४०, रा. गोवंडी, मुंबई), इरफान याकूब मोमीन (रा. मनमाड) व काकासाहेब गरूड यांचा सहभागही समोर आला. त्यांच्याही मंगळवारी (दि. १०) मुसक्या आवळण्यात आल्या. सहायक निरीक्षक के. वाघ, हवालदार राजेंद्र केदारे, पंकज देवकाते, प्रल्हाद सानप, अशोक व्यापारे, शिपाई संदीप झाल्टे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपी वाहिद सदार सय्यद (रा. गोवंडी, मुंबई), याकूब शेख व अमजद कुरेशी (रा. मुंबई) हे तिघे फरार आहेत.
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सुनील तिवारीविरोधात मुंबईतील शाहूनगर आणि बांद्रा-कुर्ला पोलिस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. तर इरफान मोमीन याच्याविरोधात मनमाड आणि निफाड पोलिस ठाण्यांमध्ये सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनी पोल्ट्री व्यावसायिक गरूड याला परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. तसेच पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कोणत्या वेळेस गस्तीसाठी येतात, त्यांची हालचाल कशी असते, यासंबंधीची माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपवली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मनमाड शहरातील लॉज चालकांकडून माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक विश्लेषण तपास, खबऱ्यांकडील माहितीच्या आधारे मुंबईतील संशयितांचा शोध घेतला. त्यांचे मनमाडमध्ये येण्याचे कारण तपासले असता हा गुन्हा उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
संशयितांनी किती पेट्रोलियम पदार्थ चोरी केला आहे. तसेच चोरी केलेले पेट्रोलियम पदार्थ कोणास विक्री केले, कोणत्या वाहनांमधून त्याची वाहतूक केली, इतर कोणत्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे चोरी केली आहे का याचाही तपास केला जात आहे.
बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
अनकवाडे परिसरातील शेतकरी संपत चव्हाण यांच्या विहिरीतील पाण्यावर डिझेलचा तवंग आढळून आला. याबाबत त्यांनी तातडीने संबंधित इंधन कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कंपनीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून तपासणी केली. तपासात इंधनवाहिनीला मोठे छिद्र पाडून अनधिकृतरीत्या कनेक्शन घेतल्याचे उघडकीस आले होते.