

लासलगाव : मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. त्यामुळे येवला-लासलगाव मतदार संघातील नाराज भुजबळ समर्थकांनी सोमवार (दि. १६) सकाळी 10 वाजेच्या सुमारास नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे रस्ता रोको केला.
तातडीने छगन भुजबळांना सन्मानपूर्वक मंत्रिपदाची शपथ न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी लासलगाव येथील या नाराज पदाधिकारी व समर्थकांकडून देण्यात आला
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील ४६ गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र भवर, दत्तात्रय डुकरे, विंचूर शहराध्यक्ष जयेश साळी, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, डॉ. श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, विलासराव गोरे यासह राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) गटाचे पदाधिकारी व भुजबळ समर्थकांनी आंदोलनात सहभाग घेतला. नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथील तीन पाटीवर अचानक रस्ता रोको केल्यामुळे पोलिस यंत्रणेची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे व शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होऊ नये यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, भुजबळांना मंत्रीपद न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.