

नाशिक : धारदार मांजाने मांडी चिरून अतिरक्तस्राव झाल्याने नऊवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वडाळा गावातील माळी गल्ली येथे घडली. विष्णू संगम जोशी असे या मुलाचे नाव आहे. (child dies due to the nylon manja in nashik)
थंडीची चाहूल लागताच पतंगप्रेमींमध्ये पतंग उडवण्याची ओढ सुरू झाली आहे. दिवाळीची सुटी असल्याने शाळकरी मुलेही पतंग उडवत आहेत. शुक्रवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास वडाळा गावातील माळी गल्ली परिसरातही काही मुले पतंग उडवत होती. तेथून जाणाऱ्या विष्णूच्या पायात धारदार मांजा अडकून त्याची मांडी कापली गेली. त्यातून अतिरक्तस्राव झाला. ही घटना समजताच विष्णूला त्याचा मावसभाऊ गणेश भदरगे यांनी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले. तेथून विष्णूला जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्ग करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पतंगप्रेमींकडून नायलॉन मांजाचा वापर सर्वाधिक होत असतो. नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री व वापरावर बंदी असली, तरी चोरट्या पद्धतीने हा मांजा बाजारात उपलब्ध असतो. या मांजामुळे दरवर्षी अनेक जण जखमी होत असून, काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पशुपक्ष्यांचा जीव टांगणीला लागतो. संक्रांतीच्या तोंडावर प्रशासन कारवाई करते. मात्र, त्यानंतर सपशेल दुर्लक्ष होते. शुक्रवारच्या घटनेने नायलॉन मांजासह काचेचा वापर असलेल्या धारदार मांजाचाही प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.