Nashik News | बायकोसाठी तो धावला कमरेएवढ्या पाण्यातून; घोटी ग्रामीण रुग्णालयात वाचले प्राण

Snake Bite : पत्नीला सर्पदंश झाल्याने वाचवण्यासाठी पतीने लावली जीवाची बाजी
घोटी ग्रामीण रुग्णालय
घोटी : ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या अश्विनी आंबेकर उपचार घेताना. दुसऱ्या छायाचित्रात सोनोशी चिखलदरा रस्त्यातील नाल्यातील पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांना सोडताना ग्रामस्थ. आदी.(छाया :- राहुल सुराणा)
Published on
Updated on

घोटी : आपल्या जीवाची पर्वा न करता संर्पदंश झालेल्या पत्नीचा जीव वाचविण्यासाठी त्याने तिला खांद्यावर घेत नाल्यातील कमरेएवढ्या वाहत्या पाण्यातून मार्ग काढला. त्यानंतर सोनाेशी गाव गाठत तेथून गाडीने पत्नीला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्वरित उपचार मिळाल्याने पत्नीचा जीव वाचल्याने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मात्र, प्रशासनाकडून सुविधा देण्यास होत असलेल्या टाळटाळीविरोधात संपात व्यक्त केला. (The husband risked his life after his wife was bitten by a snake)

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सोनोशी टाकेद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिखलदरा वस्तीमध्ये शेतकरी सुनील आंबेकर हे त्यांच्या पत्नी अश्विनीसह वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि.२७) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अश्विनी यांना सर्पदंश झाला. त्यामुळे सुनील यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन निघाले. मात्र, पावसामुळे चिखलदरा वाडी रस्त्यामधील ओहळ, नाल्यांना प्रचंड पूर आलेला. (flood rescue) त्यातच पूल नसल्याने ते ओलांडून पलीकडे जाणे कठीणअसल्याने अश्विनी यांना रुग्णालयात दाखल करण्यास उशीर होत होता. परिणामी, विष त्यांच्या अंगात भिनल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यामुळे सुनील यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वत:च्या जीवाची बाजी लावत पत्नीला खांद्यावर घेत पूर आलेला नाला पार करण्याचा निर्णय घेतला. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत सोनोशी गाव गाठले व त्यानंतर तेथील एका गाडीतून पत्नीला घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राहुल वाघ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अश्विनी या शुद्धीवर आल्याने सुनील आंबेकरांसह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सुनीलने पत्नी अश्विनीचे प्राण वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावत पत्नीला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तात्काळ उपचार करत अश्विनीचे प्राण वाचवू शकलो. शासकीय रुग्णालयात सर्व सेवा उपलब्ध असतात.

डॉ. राहुल वाघ, स्त्री रोगतज्ज्ञ, घोटी ग्रामीण रुग्णालय

सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळ वाया न घालवता व कुठेही न हलवता तात्काळ १०८ टोल फ्रिवर संपर्क करून तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे. शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधक सर्प लस सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

डॉ. एस. डी. सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, घोटी ग्रामीण रुग्णालय

पूलाअभावी ३० कुटुंबांचा जीव धोक्यात घालून प्रवास

सोनोशी येथून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या चिखलदरा धोंगडे वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर पूल नाही. त्यामुळे या भागातील जवळपास तीस शेतकरी कुटुंबियांना रात्री- अपरात्री ओहळातील पाण्यातून जीव धोक्यात घालत गावाकडे ये-जा करावी लागते. या रस्त्यावरील पुलासाठी अनेकदा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे मागणी केली, परंतु अद्यापपर्यंत चिखलदरावाडी रस्त्यावरील पूल प्रश्न सुटलेला नाही..

पूल नसल्याने पत्नीला खांद्यावर घेऊन कमरेएवढ्या ओहळतील पुराच्या वाहत्या पाण्यातून रस्ता ओलांडून घोटी ग्रामीण रुग्णालय गाठावे लागले. पुलाची सुविधा झाली तर असा जीवघेणा संघर्ष कायमचा थांबेल. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

सुनील आंबेकर, शेतकरी, चिखलदरा धोंगडे वस्ती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news