Nashik News | अगोदर 'ॲथर', आता 'टेस्ला'ची हुलकावणी

पुन्हा चर्चा राजकीय इच्छाशक्तीची : 14 सत्ताधारी आमदार, तीन मंत्री असूनही पदरी निराशाच
नाशिक
'टेस्ला' कंपनीला महाराष्ट्रात 'सीकेडी' प्रकल्प सुरू करावयाचा आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : मुबलक जमीन, पाणी, वीज, दळणवळण, कुशल मनुष्यबळ तसेच पुरेशा सोयीसुविधा असतानाही नाशिकच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.

Summary

अमेरिकेतील प्रख्यात 'टेस्ला' या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने नाशिकमध्ये प्रकल्प उभारावा यासाठी औद्योगिक संघटनांकडून पाठपुरावा केला असतानाही, हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावाजवळ जात आहे. १४ सत्ताधारी आमदार, तीन कॅबिनेट मंत्री असूनही प्रकल्प नाशिकमध्ये येत नसल्याने पुन्हा एकदा राजकीय इच्छाशक्तीची चर्चा रंगली आहे. तर यापूर्वी ॲथर या कंपनीनेदेखील नाशिकला अशीच हुलकावणी दिली होती.

नाशिक
ॲथर या कंपनीने देखील नाशिकला हुलकावणी दिली होती.Pudhari News Network

मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिकचा समावेश असतानाही मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिक औद्योगिक विकासात कोसो दूर मागे आहे. वास्तविक मुंबई, पुणे याठिकाणी औद्योगिक विकासाला फारसा वाव नसल्याने, नाशिकला प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र, नाशिकऐवजी नागपूर, छत्रपती संभाजीनगरला प्रकल्प जात आहेत. मागील वीस वर्षांपासून नाशिकला एकही मोठा प्रकल्प आला नसल्याने, अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक ॲलन मस्क यांचा 'टेस्ला' या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा प्रकल्प नाशिकला यावा, यासाठी २०२१-२२ मध्ये निमा शिष्टमंडळाने तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेत, प्रकल्पाची मागणी केली होती. मात्र, अशातही हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात गेल्याने, नाशिकची राजकीय इच्छाशक्ती पुन्हा एकदा ताेकडी पडल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात जिल्ह्यात हेवीवेट नेता नसल्याने, प्रकल्प इतर जिल्ह्यांत जात असल्याचे उद्योगवर्तुळात बोलले जात आहे. यापूर्वीदेखील नाशिकमधील प्रस्तावित 'महिंद्रा'चा प्रकल्प गुजरातला हलवल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती.

नाशिक
Nashik Industry News | 'जिंदाल'चा 700 कोटी गुंतवणुकीतून विस्तार

नाशिकला हवा 'संकटमोचक'

नाशिकमध्ये येऊ पाहणारे प्रकल्प इतर जिल्ह्यांत तसेच परराज्यांत जात असल्याने, नाशिकला कोणी वाली आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १४ सत्ताधारी आमदार, तीन कॅबिनेट मंत्री तसेच पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये आघाडीवर असलेले राज्यातील हेवीवेट नेते गिरीश महाजन एवढी मोठे राजकीय बळ असतानाही राज्याच्या राजकारणात ते काहीसे पिछाडीवर पडताना दिसून येत आहेत. अशात नाशिकला 'संकटमोचक'ची भूमिका कोण बजावणार? याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष आहे.

'सीकेडी' प्रकल्प उभारणार

'टेस्ला' कंपनीला महाराष्ट्रात 'सीकेडी' प्रकल्प सुरू करावयाचा असून, काही वर्षांपासून त्याबाबत हालचाली सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी नाशिकच्या उद्योजकांनी 'टेस्ला'चा प्रकल्प नाशिकला यावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. तेव्हाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. तसा प्रस्तावही 'टेस्ला'ला पाठवला होता. मात्र, मविआ सरकार बदलल्यानंतर याबाबतच्या हालचाली थंडावल्या होत्या.

जागेची केली होती पाहणी

चार वर्षांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावर एक हजार एकर जागेवर 'टेस्ला'चा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. २०२३ मध्ये नाशिकमध्ये जागा पाहणीही झाली होती. मात्र, त्यानंतर हा विषय थंड बस्त्यात गेला. आता राज्य शासनाने 'टेस्ला'ला पुण्याजवळचे चाकण, चिखली व सातारा येथील जागा सुचवल्या आहेत. या जागांची पाहणी झाली असून, कंपनीकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, सध्या नाशिक या कंपनीच्या विचाराधीन नसून, राज्य सरकारकडूनही नाशिकचे नाव सुचवण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ही राज्येही प्रयत्नात आहेत.

नाशिकवर सातत्याने अन्याय होत असून, 'महिंद्रा'साठीही मोठा लढा द्यावा लागला. गुंतवणूक परिषदेत जाहीर झालेले प्रकल्पही प्रत्यक्षात आले नाहीत. छत्रपती संभाजीनगरकडे मात्र आवर्जून लक्ष दिले जात आहे.

धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news