

देवळा: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना वीरमरण आलेल्या पाटे (ता. चांदवड) येथील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील जवान किशोर ठोके यांच्या बलिदानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी देवळा येथील श्रीमान सुगणमजली सुराणा व्यापारी पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्यावतीने शहीद जवानाच्या पत्नी वैशाली ठोके यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
गेल्या चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना किशोर ठोके यांना वीरमरण आले होते. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी सुराणा पतसंस्थेचे पदाधिकारी त्यांच्या भेटीस गेले. देवळा येथील ही पतसंस्था गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत देत आहे.
मदत सुपूर्द करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रमणलाल सुराणा यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. "नाशिक जिल्ह्यात सुमारे दोन हजार पतसंस्था कार्यरत आहेत. जर प्रत्येक पतसंस्थेने शहीद कुटुंबाला किमान ५ हजार रुपयांची मदत केली, तरीही एका कुटुंबाला १ कोटी रुपयांपर्यंतचा मोठा मदतीचा हात मिळू शकतो. जिल्ह्यातील इतर पतसंस्थांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे."
हा धनादेश सुपूर्द करताना पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप सुराणा, उपाध्यक्ष संजय कानडे, संस्थापक डॉ. रमणलाल सुराणा, संचालक अशोक गोळेचा, जनार्दन शिवदे, प्रवीण सुराणा आणि सुनील बुरड उपस्थित होते. यावेळी शहीद जवानाचे नातेवाईक जगन ठोके, शिवराम ठोके, पंकज ठोके आणि वीरमाता यांनीही उपस्थिती लावली. मान्यवरांनी वीरपत्नी वैशाली ठोके यांचे सांत्वन करत धीर दिला.