

चांदवड (नाशिक): चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी अखेर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. दरम्यान. अविश्वास ठरावाच्या एक दिवस आधी जाधव यांनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (दि.१६) सभापतीवर होणाऱ्या अविश्वासाच्या कारवाईचे फक्त सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.
चांदवड बाजार समितीच्या 'सभापती'पदावरून गेल्या काही महिन्यांपासून कलगीतुरा बघावयास मिळाला. विद्यमान सभापती संजय जाधव यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या सहकाऱ्यास संधी द्यावी, असा आग्रह धरला जात होता. मात्र, जाधव यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने विद्यमान १२ संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठरावाची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार चांदवडचे उपविभागीय प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावावर चर्चेसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यापूर्वीच विद्यमान सभापती संजय जाधव यांनी नाशिकचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केल्याने अविश्वास ठरावाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे लवकरच नवीन सभापती व उपसभापती यांची नियुक्ती होणार आहे. खुर्चीच्या या रस्सीखेचीत उर्वरित संचालकांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मी २०२३ मध्ये सभापतीची धुरा हाती घेतली. माझ्या कारकिर्दीत बाजार समितीने अनेक उच्चांक गाठले आहेत. ग्रामीण भागात उपबाजार सुरू राहावा यासाठी सतत प्रयत्न केले. कामकाज करताना सर्वाना सोबत राहून बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे.
संजय जाधव, सभापती, कृउबा चांदवड