इंदिरानगर : पाथर्डी परिसरातील एकनाथ नगर येथे घरी परतणाऱ्या महिलेवर भटक्या श्वानाने जीवघेणा हल्ला करीत जखमी केले आहे. प्रसंगावधान होत परिसरातील रहिवाशी धावल्याने महिलेचे प्राण वाचले आहेत. प्रज्ञा दादाभाऊ केदार या आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना शनिवार (दि.१३) रोजी दुपारच्या सुमारास सात ते आठ भटक्या श्वानांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
प्रज्ञा यांनी श्वानांच्या हल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाच ते सात मिनिटापर्यंत श्वानांनी त्यांच्यावर हल्ला सुरुच ठेवला. यावेळी प्रज्ञा यांनी आरडाओरड केल्याने परिसरात जवळ असलेले बंगले व रो हाऊस मधील रहिवासी धावून आल्याने व त्यांनी भटक्या श्वानांना हाकलून लावले. सुदैवाने प्रज्ञा यांना गंभीर दुखापत झाली नाही परंतु त्या अजूनही खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. सध्या परिसरात भटक्या श्वानांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ठिकठिकाणी असे भटके श्वान ग्रुपने ठिकठिकाणी दिसून येत आहेत.
पावसाळ्यामध्ये भटक्या श्वानांची मेटॅलिटी खराब होत असल्याने या दिवसात ते जास्त ॲग्रेसिव्ह होऊन हल्ला करण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे केदार यांच्याबरोबर त्यांचे शाळेत जाणारी मुले नसल्याने या हल्ल्यातून ते बचावले. परंतु अशा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर, वृद्धांवर हल्ला होण्याची संभाव्य शक्यता येथील रहिवाशांनी बोलून दाखवली. प्रज्ञा केदार यांना तातडीने खाजगी रुग्णालय रुग्णालयात हलवले आहे. परंतु त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात श्वानदंश झालेले आणखी काही रुग्ण असल्याने त्या ठिकाणी सध्यस्थितीत बेडच उपलब्ध नसल्याने तात्पुरता इलाज करून अशा रुग्णांना घरी सोडून देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात परिसरात वाढली आहे. अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त मनपा प्रशासनाकडून वेळीच होणे गरजेचे आहे. रहिवाशी धावून आल्यामुळे प्रज्ञा केदार यांचा जीव वाचला. परंतु शालेय विद्यार्थी ज्येष्ठ ,वृद्ध नागरिकांवर असा हल्ला झाल्यास त्यांना प्राणास मुकावे लागू शकते. याची गांभीर्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी.
धर्मा केदार ,एकनाथ नगर, पाथर्डी परिसर. सिडको, नाशिक.