

लासलगाव : कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करावी, जिल्ह्यातील १५ आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडावी, या मागणीसाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढत शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व छावा क्रांतिवीर सेना पदाधिकाऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
लासलगाव बाजार समितीत १०२० वाहनांतून आलेल्या कांद्याच्या लिलावास सुरुवात झाली. कांद्याला ४०० ते १४०१ रुपये दर मिळाला. मात्र, ११ पर्यंत ५५२ वाहनांतील कांद्याचा लिलाव पूर्ण झाला असताना बहुतांश कांद्याला ६०० ते ९०० रुपयांदरम्यानच दर मिळत असल्याने माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे, संतोष पानगव्हाणे, अभिजित डुक्रे, गोरख संत, नवनाथ वैराळ यांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच उपसभापती संदीप दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
आंदोलनकर्त्यांनी १५ आमदारांशी संपर्क साधत विधिमंडळात लक्षवेधी मांडण्याची विनंती केली. आंदोलनात सभापती डी. के. जगताप यांनी दूरध्वनीद्वारे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की मी ५०० रुपये अनुदानाचा मागणी केली असून, पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. शोले स्टाईल आंदोलनादरम्यान आ. माणिकराव कोकाटे, खा. भास्कर भगरे, आ. राहुल आहेर, आ. दिलीप बनकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील व शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. विधिमंडळात लक्षवेधीसाठी वेळ मागितला जाईल, असे आश्वासन दिले.
उपसभापती दरेकर, सचिव वाढवणे व सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या विनंतीनंतर आंदोलनकर्ते खाली उतरले. मात्र, शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
“न्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलनाचा अधिकार हा भारतीय संविधानाने सर्वांना दिलेला आहे. मात्र, आपल्या व आपल्या इतर सहकाऱ्यांच्या जीवावर बेतेल, असे आंदोलन कोणीही करू नये.
”दीपक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, लासलगाव