नाशिक : देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूलच्या तोफखाना मुख्यालय जनरल स्टाफ ऑफिसर यांच्यातर्फे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील झेड सेक्टर या ठिकाणी दि. 29 नाव्हेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 4 या कालावधीत गोळीबाराची प्रात्यक्षिके केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
नाशिक तालुक्यातील वंजारवाडी तसेच इगतपुरी तालुक्यात टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तर्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कवडदरा, सामनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूरवैद्य, टाकेद बुद्रुक, धामणगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर दुमाला, बेळगाव कुर्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरवीर खुर्द, लहवित, अस्वली या झेड सेक्टरमधील गावांच्या मुलकी हद्दीतील काही भाग तोफांच्या मार्याच्या रेषेत येतात. हा विशिष्ट भाग कोणता आहे याबाबत संबंधित गावांना दवंडीद्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे गोळीबार प्रात्यक्षिकाच्या दिवशी व त्यावेळी धोक्याच्या हद्दीत नागरिकांना प्रवेश करण्यास व तेथे जनावरे पाठविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही. या सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा राजेंद्र वाघ यांनी दिला आहे.