

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०२५-२८ या कार्यकाळासाठी निवडणूक शनिवार (दि.3 मे) रोजी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. ४) सकाळी ११ वाजता अनंत कान्हेरे मैदानातील क्रिकेट पॅव्हेलियन हॉलमध्ये असोसिएशनची सर्वसाधारण सभा होणार असून, नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.
असोसिएशनने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये अधिकारपत्र स्वीकारणे, मतदारयादी प्रसिद्ध करणे, नामांकन अर्ज वाटप व छाननी, अर्ज माघारी, अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप, आवश्यक असल्यास मतदान व मतमोजणी, तसेच अंतिम निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, एकूण पाच पदाधिकारी, १० कार्यकारी सभासद व तीन निवड समिती सदस्यांच्या निवडीसाठी १५ व ३ अर्ज आल्यास निवडणूक बिनविरोध होईल व प्रत्यक्ष मतदानाची आवश्यकता राहणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
क्लब/ संस्था/कार्यालयांचे अधिकारपत्र स्वीकारणे : १९ एप्रिल सायंकाळी ५ पर्यंत,
मतदार यादी प्रसिद्ध करणे : २० एप्रिल सायंकाळी ५ वाजता.
नामांकन वाटप आणि स्वीकृती : २३ एप्रिल सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
अर्ज छाननी : २३ एप्रिल सायंकाळी ५ वाजता.
नामांकन अर्ज माघारी घेणे : २४ एप्रिल सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप : २५ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंत.
मतदान (आवश्यक असल्यास) ३ मे रोजी सकाळी ८.३० पासून सायं. ५ वाजेपर्यंत.
४ मे रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक निकाल जाहीर करण्यात येईल.