

नाशिक : जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्व्हर बंद पडत असल्यामुळे मोफत धान्य वितरणात अडथळा येत आहे. यामुळे लाभार्थ्यांची केवळ गैरसोय होत नाही, तर दुकानदारांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रेशन दुकानांमध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होत असून, वादविवादही वाढले आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारकांना धान्य वितरणासाठी अंगठा ओळखण्याची प्रणाली वापरली जाते. मात्र, सध्या ई-पॉस मशीनवर नोंदणीच होत नसल्याने धान्याचे वितरणच थांबले आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या रेशन दुकानदारांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ‘आमच्यावर नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे आणि आम्ही अक्षरशः हैराण झालो आहोत. सर्व्हरची अडचण तात्काळ सोडवावी,’ अशी मागणी दुकानदारांनी केली.
ई-पॉस मशीनचा सर्व्हर सुरळीत चालू ठेवणे
रखडलेले दुकानदारांचे कमिशन तात्काळ अदा करणे
लाभार्थ्यांना वेळेत व सुरळीत धान्य वितरणाची हमी
याशिवाय, दुकानदारांचे तीन ते चार महिन्यांचे कमिशन रखडले असल्यानेही असंतोष वाढला आहे. त्यामुळे निवृत्ती कापसे, माधव गायधनी, दिलीप नवले, ढवळू फसाळे, अशोक बोराडे आणि दिलीप घोटेकर या जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कमिशनची रक्कम लवकरात लवकर अदा करण्याची मागणी केली आहे.