

देवळाली कॅम्प (नाशिक) : येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड वाॅर्ड सातमधील शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीचे शेड असतानाही वर छताला पत्रेच नाहीत. त्यामुळे आहे त्या स्थितीत चितेवर छत्रीचा आधार घेऊन उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मरणानंतरही मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे भयाण वास्तव सध्या नाशिकच्या तालुक्यातील शिंगवे बहुला येथे दिसून येत आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाॅर्ड सातमध्ये शिंगवेबहुला, अंबडवाडी गावांसाठी स्मशानभूमी असताना, तेथे छताला पत्रेच नाहीत. गेल्या २५ वर्षांपासून या स्थितीतील ही स्मशानभूमी केवळ उभी असून, येथे फक्त शेडचा सांगाडा दिसतो. मात्र वरील छताला पत्रे नसल्यामुळे याअभावी भर पावसात अंत्यसंस्कार करण्यासाठी हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. काल येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम पाळदे यांचे निधन झाले. अंत्यविधीसाठी रचलेली लाकडे पावसाने ओली झाल्यामुळे अंत्यविधी करायचा कसा? हा प्रश्न उभा ठाकला होता. पाऊस थांबेल याची वाट पाहाण्यात खूप वेळ गेला. छताला पत्रे नसल्यामुळेच नागरिकांना छत्रीच्या आधारात उभे राहावे लागले.
स्मशानभूमी संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाला वारंवार निवेदने, तक्रारी देऊनदेखील याकडे डोळेझाक केली जात आहे. प्रशासनाने योग्य कार्यवाही करून प्रशासनाकडे तत्काळ येथील स्मशानभूमी दुरुस्तीसंदर्भात प्रस्ताव सादर करावा.
प्रमोद मोजाड, शिवसेना ठाकरे गट नेते
स्मशानभूमीसंदर्भात जनसुविधांतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोजाड हे मागील तीन वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून कोणतेही लक्ष दिले जात नाही. त्यातच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अंत्यसंस्कार विधीसाठी फक्त दोनच स्मशानभूमी आहेत. नवीन स्टेशनवाडी व शिंगवेबहुला स्मशानभूमी येथे सुविधांचा अभाव असल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागते .