

नाशिक : संततधार पावसामुळे जुन्या नाशकातील चव्हाटा भागातील जुन्या वाड्याचा काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास घडली. वाड्याच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या दोन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
शहरात धोकेदायक वाडे, घरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने सालाबादाप्रमाणे यंदाही शहरातील बाराशेवर धोकेदायक जुने वाडे, पडक्या घरांच्या मालक, भोगवटादारांना नोटिसा बजावल्या. या घरांना पोलिस बंदोबस्तात उतरविण्याची कारवाई मात्र कागदावरच राहिली आहे. त्यामुळे पावसाचा जोर चढताच धोकेदायक वाडे, घरे कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी जुन्या नाशकातील चव्हाटा येथील देवी मंदिराच्या मागे असलेला सय्यद यांचा वाडा (घर क्रमांक. ३५१५)चा काही भाग कोसळला. यानंतर लगतच्या विजय शिंदे यांच्या घराची भिंत देखील कोसळली. घराच्या वरच्या मजल्यावर दोन लहान मुले अडकली होती. त्यांना स्थानिक तरुणांनी मदतकार्य करून सुखरूप बाहेर काढले. हा वाडा सय्यद आणि शिंदे यांच्या मालकीचा आहे. याठिकाणी विजय शिंदे वास्तव्यास होते. तसेच आरीफ सय्यद यांचा परिवार दुसर्या ठिकाणी वास्तव्यास होता. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या घराच्या भिंतींना तडे गेले होते. शेवटी आज ते संपूर्णपणे कोसळले. घराच्या शेजारी असलेल्या रहिवाशांनी वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच नाशिक महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने धोकादायक घरे व वाड्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांनी याआधीच महापालिकेला सदर घराची धोकादायक स्थिती कळवली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.