

नाशिक : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल रोजी रद्द झालेली बैठक ही आता सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेत हाेत आहे. बैठकीत शिक्षण विभागाशी निगडित १७ विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. मंत्री भुसे यांनी बुधवारी ही बैठक बोलवली होती.
आता सोमवारी जि. प.च्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात ही बैठक होत असून, त्यात एकूण १७ विषयांवर मंथन होणार आहे. यात पीएम श्री शाळा, शाळांच्या पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, शिष्यवृत्ती, आधार पडताळणी, निपुण महाराष्ट्र, पवित्र पोर्टल, शिक्षक समायोजन, शिक्षक-पालक मेळावा, स्मार्ट स्कूल, पटसंख्या वाढीसाठी उपाययोजना, शिक्षण संस्थांनी राबविलेले नवोपक्रम, आदर्श शिक्षक आदी विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विभागीय शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.