

नाशिक : शहरात पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असलेली टोइंग कारवाई स्थगित करण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासनाने सर्वप्रथम पार्किंग झोन विकसित करावेत, वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी त्यानंतरच टोइंग व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
शहरात चार ते पाच महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा टोइंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यास नाशिककरांकडून विरोध होत असून, काँग्रेसनेदेखील आता यात उडी घेतली आहे. दंडाची रक्कम अवाजवी असून, सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे अशा प्रकारे दंड वसूल करून नागरिकांची लूट केली जाऊ नये. टोइंग कारवाई करताना शहरात पार्किंगची व्यवस्था आहे काय? याचाही विचार प्रशासनाने करावा. अगोदर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यानंतरच कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पोलिस आयुक्त कर्णिक यांनी, प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड, शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, उपाध्यक्ष माया काळे, सिडको ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तनवीर तांबोळी, शहर काँग्रेस आदिवासी विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार, भालचंद्र पाटील आदी उपस्थित होते.