

नाशिक : सांडपाण्याची उपाययोजना न करता प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या मनोहर गार्डन, सिटी प्राइड या बड्या हॉटेल्ससह १६ आस्थापनांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या अन्य हॉटेल्स, रेस्टॉरंटचे धाबे दणाणले असून, नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईस सामोरे जा असा इशाराच एमपीसीबीने दिला आहे.
शहर व परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंटचे मोठे जाळे असून, यातील बहुतांश हॉटेल्सकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. आश्चर्य म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आघाडीवर आहेत. सांडपाण्याबरोबरच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची तसदी देखील या हॉटेल्सकडून घेतली जात नसल्याने, एमपीसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. एमपीसीबीच्या पथकाने जेव्हा अचानक या आस्थापनांची पाहणी केली, तेव्हा गैरअनुपालनाच्या बाबी पथकाच्या निर्दशनास आल्या. दरम्यान, या बेजाबदार हॉटेल्सबाबत नागरिकांच्याही तक्रारी असून, एमपीसीबीने केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
- मनोहर गार्डन
- हॉटेल सिटी प्राइड
- हॉटेल सह्याद्री
- हॉटेल सेवन स्काय
- हॉटेल फाइव्ह एलीमेन्टस
- हॉटेल धुव्र पॅलेस
- एक्स्प्रेस इन केशिया रिसॉर्ट (सावरगाव)
- पाट्रीकल रिट्रीट
- हॉटेल शिवानंद
- हॉटेल शिवाय इन
- हॉटेल त्रिवेणी
- स्ट्रॉबेरी हिल्स हॉटेल अॅण्ड रिसॉर्ट
- श्रीफळ रिसॉर्ट
नियम धाब्यावर बसविणाऱ्या सर्व्हिस सेंटरवरही एमपीसीबीचा वॉच असून, गैरअनुपालन करणाऱ्या शहरातील सर्व्हिस सेंटरवर कारवाई केली जाणार असल्याने एमपीसीबीने स्पष्ट केले आहे. लवकरच याबाबतची मोहिम हाती घेतली जाणार आहे. दरम्यान, एमपीसीबीने अंबड औद्योगिक वसाहतीतील आकाश व्हील या सर्व्हिस सेंटरला क्लोजर नोटीस बजावली आहे.
सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्लेटिंग, कोटिंगच्या उद्योगांवर यापूर्वी वेळोवेळी एमपीसीबीने कारवाई केली आहे. अशाच सिन्नर, माळेगाव स्थित औद्योगिक वसाहतीतील केमिकल इंडस्ट्रीला क्लोजर नोटीस बजावण्यात आली असून, इतर केमिकल उद्योगांनी नियमांचे पालन करावे असा इशारा एमपीसीबीने दिला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मनुष्यबळाची प्रचंड चणचण असल्याने, उपलब्ध मनुष्यबळातच आस्थापनांची पाहणी करावी करावी लागत आहे. सद्यस्थितीत एमपीसीबीकडे चारच क्षेत्र अधिकारी असल्याने, धडक कारवाईस अडथळे येत आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र प्रधान कार्यालयात पाठविण्यात आल्याचे एमपीसीबीने सांगितले आहे.
उद्योग, व्यवसाय बंद व्हावेत हा आमचा मुळीच हेतू नाही. केवळ नियमात राहून व्यवसाय करावेत. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येकाने नियम पाळावेत.
- एल. एस. भड, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी.