

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर टोल भरण्याच्या वादातून टोलनाक्यावरील कर्मचारी व प्रवाशात जोरदार हाणामारी झाल्याची घटना रविवारी (दि. १०) रात्री समोर आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव टोलनाक्यावर कारने जाणारा एक युवक आणि टोलनाका कर्मचाऱ्यांमध्ये गाडी सोडण्यावरून वाद झाला. पुढे हा वाद वाढत गेल्याने त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. प्रवासी तरुणाने कुणालाही न जुमानता कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. दरम्यान बघ्यांची गर्दी जमल्यानंतर काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र, संबंधित युवकाने २० ते २५ युवकांना घेऊन टोलनाक्यावर पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिंपळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी या घटनेची दखल घेत दहशत निर्माण करणाऱ्या युवकांविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.