नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या 21 जुलै रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा 25 ऑगस्ट,2024 रोजी घेण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे एमपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलमधून परीक्षेच्या जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकद्वारे विकल्प सादर करू शकतील.
संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरिता दिनांक 15 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत विकल्प सादर करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणार्या तसेच नव्याने अर्ज सादर करणार्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक 14 ऑगस्टपर्यंतचे असणे आवश्यक आहे. या परीक्षेकरिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करणार्या उमेदवारांनी 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी 2024, 08 मे, 2024 व 30 मे, 2024 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल केलेला नाही, असेही आयोगाने प्रसिध्दिपत्रकात नमूद केले आहे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ देण्यात येणार नाही.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे अथवा इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गाचा विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रक्रियेदरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.