नाशिक : वाहकांच्या संपामुळे आजवर वेठीस धरल्या गेलेल्या सिटीलिंकची साडेसाती सुरूच असून, वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी आता चालकांनी संप पुकारल्याने सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि. २७) ठप्प झाली. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली ३०० चालकांनी संपात उडी घेतली. दरम्यान सिटीलिंक प्रशासनाने 'मेस्मा' कायद्यांर्तगत आडगाव व नाशिकरोड पोलिस ठाण्यात ३२ संपकरी चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या तीन वर्षांतील सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा हा दहावा संप आहे. अचानक झालेल्या या संपामुळे विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल झाले.
महापालिकेने 'सिटीलिंक कनेक्टींग नाशिक'च्या माध्यमातून ८ जुलै २०२१ पासून 'ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट' तत्त्वावर शहर बससेवा सुरू केली आहे. खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सद्यस्थितीत शहरात २५० बसेस चालविल्या जातात. ऑपरेटर्सकडून चालकांना नाममात्र वेतन दिले जात असल्यामुळे त्यांना उपासमार सहन करावी लागत आहे. त्यामुळे वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली बस चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मूळ वेतनात १२ हजारांची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून मिळण्याची बस चालकांची मागणी आहे. प्रति किलोमीटर दोन रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा. तसेच तपोवन डेपो व नाशिक रोड बस चालकांचे मूळ वेतन समान करावे, अशीही चालकांची मागणी आहे. गत १३ जुलै रोजी या संपाचा इशारा संघटनेने सिटीलिंक प्रशासनाला दिला होता. ऑपरेटर्स समवेत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, मागण्या मान्य न झाल्यामुळे शनिवारपासून संप पुकारला गेला. त्यामुळे सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही. दरम्यान, संपकरी चालकांविरोधात सिटीलिंक प्रशासनाने मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. आडगाव व नाशिकरोड पोलिस ठाण्यात ३२ संपकरी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिटीलिंकच्या माध्यमातून महापालिकेने शहर बससेवा सुरू केल्यापासून हा दहावा संप आहे. यापूर्वी मक्तेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी नऊ वेळा संप पुकारला आता चालकांनी दहावा संप पुकारला आहे. अचानक झालेल्या संपामुळे बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे विशेषत: विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल झाले. संकट हीच संधी समजत खासगी प्रवाशी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसली. सिटीलिंकलाही लाखोंचा तोटा सहन करावा लागला आहे.
कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जाते. सिटीलिंकच्या सर्व कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. चालकांनी संप पुकारल्याने मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल.
मिलिंद बंड, महाव्यवस्थापक (संचलन), सिटीलिंक.
१ सप्टेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२, ६ एप्रिल २०२३, ११ मे २०२३, १८ व १९ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, २२ नोव्हेंबर २०२३, फेब्रुवारी २०२४ व १४ मार्च २०२४ पासून असा नऊ वेळा सिटीलिंकच्या वाहकांनी संप पुकारला होता. त्यानंतर २७ जुलै २०२४ रोजी चालकांनी पुकारलेला हा दहावा संप आहे.
अत्यल्प वेतन देऊन सिटीलिंक बसचालकांची आर्थिक कोंडी केली जात आहे. त्याविरोधात संपाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. मात्र, नाशिककरांच्या हिताचा विचार करून संप स्थगित केला होता; परंतु प्रशासन दखल घेत नसल्यामुळे संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
अंकुश पवार, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटना.