सिडको : सिडको प्रभाग क्रमांक २५ मधील सांळुके नगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी प्रभागाचे माजी नगरसेवक व ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मनपा सिडको पाणीपुरवठा विभाग कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मंगळवारी (दि.6) रोजी येथील भागात भेट देऊन पाहणी करणार आहे. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
गोकुळ पगारे, प्रभारी उपअभियंता पाणी पुरवठा विभाग सिडको
साळुंकेनगर भागात काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे . पाणी कमी दाबाने येते तर कधी येत नाही मनपा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली परंतू मनपा पाणी पुरवठा अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सावतानगर येथे माजी नगरसेवक व ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेतली. मनपा सिडको विभागीय कार्यालयातील पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांची भेट घेऊन आंदोलन पुकारले. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी साळुंकेनगर व परिसरातील नागरिक प्रकाश गडाख, रमेश होळकर, विलास शिंदे, नितीन खैरनार, कैलास जाधव, योगेश थोरात, संजय मोरे, सतीश केळकर, मोहन गांगुर्डे, राज गोरे, संजय पाटील आदी नागरिक उपस्थित होते.