

चांदवड : एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी पार केल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परिणामी काही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर तीन गावांसह एका वस्तीवर तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
नांदूरटेक, वाद वराडी, कुंडाणे व चिंचबारी शेड वस्तीवर शासकीय टँकर सुरू झाले आहे. या भागांना दररोज १२ हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर पाच खेपांद्वारे पाणीपुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे हा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे करण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, टंचाईचा प्रश्न उभा राहतो. मात्र दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव कायम जाणवत आहे.