

देवळाली कॅम्प (नाशिक) : कोट्यवधी रुपये खर्च करून भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थीम पार्क बनवण्याचे स्वप्न बघणाऱ्या सरकारने येथील स्मशानभूमीची अवकाळा दूर करण्यासाठी विविध सुविधा द्याव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी भगूर नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
नाशिक तालुक्यातील एकमेव नगरपालिका असलेल्या व स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरनगरीतील स्मशानभूमीला अवकळा आली आहे. नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने भगूरच्या रहिवाशांना नागरी सुविधांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, अशी खंत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण व शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी भगूर नगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन देत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
स्मशानभूमी अनेक समस्यांनी जर्जर झाली आहे. तेथील स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. जागोजागी कचरा साठला आहे. शेडमधून होणारी गळती थांबविणे गरजेचे आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसचे पाऊस पडल्यास स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागेवर पाणी साचते, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
शिवाय स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे बसवावेत, दिव्यांची सोय करावी आणि गळणाऱ्या शेडची दुरुस्ती करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. बांधकाम अभियंता सिद्धेश मुळे यांना निवेदन देताना सुमित चव्हाण, श्याम देशमुख यांच्यासह भाजप शहर उपाध्यक्ष नीलेश हासे, शिवसेना शिंदे गटाचे सुनील जोरे, राजेश गायकवाड, प्रवीण वाघ, संदीप बागडे, हरीश देशमुख आदी उपस्थित होते.