

नाशिक : इलेक्ट्रिक व्हेइकल उत्पादनात आघाडीवर असलेल्या एथर एनर्जी कंपनीने छत्रपती संभाजी नगर येथे तब्बल दोन हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सद्वारे दिली. मात्र, प्रारंभी ही कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक होती. कंपनी व्यवस्थापनाने सिन्नर एमआयडीसीमध्ये जागेची पाहणी देखील केली होती. तसेच कुशल मनुष्यबळाच्या स्त्रोताची चाचपणी केली होती. नाशिकमध्ये प्रकल्प उभारण्यात कंपनी सकारात्मक असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूकीची घोषणा केल्याने, जिल्ह्यातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे.
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीमध्ये रिलायन्स उद्योग समूहाच्या रिलायन्स लाईफ सायन्सेस या उपकंपनीच्या गुंतवणूकीचा अपवाद वगळता गेल्या वीस वर्षात नाशिकमध्ये मोठे उद्योग आणण्यात स्थानिक नेत्यांना सपशेल अपयश आले आहे. जेव्हा एथर कंपनीने नाशिकमध्ये आपला प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या, तेव्हा नाशिककरांचे मोठ्या उद्योगाचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याशिवाय नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राची ओळख आॅटोमोबाइल उद्योगांशी निगडीत असल्याने एथर कंपनीला सर्व बाबी सहाय्यभूत होतील अशी स्थिती होती. नाशिकचे रस्ते, रेल्वे, हवाई दळणवळण, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळांसाठी महाविद्यालयांचे जाळे, आयटीआय महाविद्यालय आदी जमेच्या बाबी कंपनी व्यवस्थापनाच्या निर्दशनास आणून दिल्या होत्या. सिन्नर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील भूखंडांचे पर्याय देखील उपलब्ध करून दिले होते. एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मते, कंपनी व्यवस्थापनाला देखील नाशिकच्या जमेच्या बाबी भावल्या होत्या. असे असतानाही कंपनीने छत्रपती संभाजी नगरमध्ये गुंतवणूक केल्याने, जिल्ह्यात प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये रंगत आहे.
दरम्यान, एथरकडून छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार असून, त्या माध्यमातून चार हजार रोजगार निर्माण होणार आहेत. येथील प्रकल्पात बॅटरी पॅक आणि वाहने दोन्ही तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पात वार्षिक ४.३ लाख बॅटरी पॅक तर ४.२ लाख वाहने तयार करण्यात येणार आहेत. एथर कंपनीची महाराष्ट्रातील ही पहिलीच गुंतवणूक असून, त्यांचे होसून आणि तामिळनाडू येथे प्रकल्प आहेत.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक भूखंडांचे परवडणारे दर लक्षात घेता, एथर कंपनीने ७० एकर जागेची एमआयडीसीकडे मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून कंपनी व्यवस्थापनाला जिल्ह्यातील विविध औद्याेगिक वसाहतींमध्ये जागेचे पर्याय उपलब्ध करून दिले होते. कुशल मनुष्यबळाचे स्त्रोतही कंपनी व्यवस्थापनाच्या निर्दशनास आणून दिले होते.
आॅटोमोबाइलसह इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठी नाशिकची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नाशिकला एकही आॅटोमाेबाइल इंडस्ट्री आली नसून, राज्यकर्त्यांकडून त्यादृष्टीने प्रयत्नही केले जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात आॅटोमोबाइल उद्योगांशी निगडीत एखाद्या कंपनीने गुंतवणूकीचा विचार केल्यास, त्यांच्यासमोर छत्रपती संभाजीनगरचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. तर नाशिकला फार्मा अन् फुड उद्योगांसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.