

नाशिक : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सज्ज झाला आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते, बियाणांची विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकातील सदस्यांची नावे, संपर्क क्रमांक असलेला फलक दुकानात दर्शनी भागात लावण्याचे आदेश आहेत.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. मशागतीची कामे होत आहेत. मान्सूनपूर्व आणि मान्सून यामध्ये अंतर राहणार नसल्यामुळे पेरणी व लागवडीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. त्यात मक्याचे सर्वाधिक क्षेत्र राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्यादृष्टीने बियाणांचा मुबलक साठा आहे. मात्र, रासायनिक खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. यात युरिया व डीएपी या दोन खतांचा तुटवडा भासू शकतो. तसेच कंपन्यांकडून खतांचे लिंकिंग होण्याची शक्यता असते. रासायनिक खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्यक खते खरेदीसाठी भाग पाडण्यास शासनाने बंदी घातली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात पथक तैनात केले आहे. त्यात समाविष्ट अधिकारी, कर्मचारी यांचे मोबाइल क्रमांक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात येतील. त्यांनी दर्शनी भागात हे क्रमांक प्रसिद्ध करायचे आहेत. त्यावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतील.
कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची तयारी केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या लिंकिंगविषयी तक्रारी असतील, ते या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतील. तक्रारीवर तत्काळ कार्यवाही होईल.
संभाव्य मागणी विचारात घेऊन युरिया व डीएपी या खतांचा साठा करण्यात येत आहे. मागणी वाढल्यास ही खते बाजारात उपलब्ध करून दिली जातील.
संजय शेवाळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, नाशिक.