

नाशिक : मागील 50 वर्षांपासून गावाच्या नावामुळे अडचणीत सापडलेल्या कोंढारकरांना अखेर दिलासा मिळाला. नांदगाव तालुक्यातील भार्डी या गावाचे नाव बदलून 'कोंढार' असे करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जारी केले. गावाच्या जुन्या नावामुळे शासकीय कागदपत्रांमध्ये तफावत निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांना कर्जप्रकरणे, योजनांचा लाभ घेणे आणि इतर शासकीय कामकाजांत अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार शासन दरबारी अर्ज करून नाव बदलण्याची मागणी केली होती. ती आता शासनाने मान्य केल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोंढार हे गाव पूर्वी भार्डी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत होते. सन १९६६ मध्ये भार्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कोंढार स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आले. मात्र, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गटांतील भोगवट्यांच्या कागदपत्रांवर भार्डी हेच नाव नोंदलेले असल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या.
शासकीय योजनांचा लाभ मिळवताना तसेच इतर कागदपत्रांच्या व्यवहारात हे नाव अडथळा ठरत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नांदगावचे तहसीलदार, कोंढार आणि भार्डी ग्रामपंचायत यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक अहवाल दिला आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
स्थानिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी अखेर भार्डी हे नाव वगळून कोंढार हे अधिकृत नाव लागू करण्याचे आदेश दिले. तब्बल अर्धशतकानंतर गावाच्या नावाला मिळालेल्या या मान्यतेबद्दल कोंढारकरांनी प्रशासनाचे आभार मानले.